Sunday, November 2, 2025

बळीराजाला सुखी, समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडं!, कार्तिकी यात्रेची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न

पंढरपूर, न्यूज नेटवर्क :
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 130 कोटीचा निधी मंजूर केलेला होता. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले असून प्रशासनाने हे काम अत्यंत जलद गतीने पूर्ण करून भाविकांना दर्शनाची सुविधा सुलभ व कमी वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कार्तिकी यात्रा 2025 च्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, तानाजी सावंत, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व समिती सदस्य तसेच समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना दर्शन रांगेत चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन मंडप काम गतीने होणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केलेले असून वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळत आहे. कारण वारकरी हाच व्हीआयपी असल्याचे त्यांनी सांगून वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने चांगले नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यावर मोठे संकट आलेले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून शासनाने 32 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलेले आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समितीची स्थापना केल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडं पांडुरंगाला घातले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्य परिवहन महामंडळ मार्फत मानाच्या वारकऱ्यांना वर्षभर एसटीने प्रवास करण्यासाठी मोफत पास दिला जातो. यापुढील काळात या वारकऱ्यांना कायमस्वरूपी एसटीचा मोफत पास देण्यात येणार आहे. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे असलेली महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची जागा आणखी पुढे तीस वर्ष राहील असा करार लवकरच करण्यात येणार आहे. तसेच सर्वे नंबर 161 मधील जागा मंदिर समितीला देण्याबाबतचा प्रस्ताव पुढील महिन्यात नगर विकास विभागाला सादर करावा, याबाबतचाही निर्णय तात्काळ घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. आपल्या राज्याने सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम करून प्रथम क्रमांकावर राहावे, विविध कल्याणकारी योजनाची प्रभावी अंमलबजावणी करून राज्याच्या विकासाची पताका सर्वत्र फडकावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्याप्रमाणेच  चंद्रभागा नदीसह सर्व नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यावर्षीच्या कार्तिकी वारीमध्ये भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त पाच कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही शिंदे यांनी सांगून राज्यातील सर्व भाविकांना कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच मानाच्या वारकऱ्यांचे अभिनंदन केले व या यात्रा कालावधीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार व स्थानिक प्रशासन यांनी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावर्षी प्रथमच कु. मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली होते. यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने तयार केलेल्या दैनंदिनी 2026 चे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले तर आभार कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मानले.
================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...