Sunday, September 7, 2025

प्रशांत सुभाष गुरव यांना 'राज्यस्तरीय माणिक शिक्षणसेवा गौरव पुरस्कार 2025' जाहीर

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
कै. माणिकराव पाटील एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर हे गेली दहा वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध उपक्रमांद्वारे समाजाला भरीव मदत करत आहे. याच माध्यमातून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन फाउंडेशनमार्फत केला जातो. राज्यातील सर्व जिल्ह्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, कृषी, क्रीडा, गिर्यारोहण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी बारा वाजता राजश्री शाहू स्मारक भवन,कोल्हापूर येथे भव्य-दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.

आजरा तालुक्यातून भादवण हायस्कूल, भादवणचे विज्ञान व गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक प्रशांत सुभाष गुरव यांना 'माणिक शिक्षण सेवा गौरव पुरस्कार' नुकताच जाहीर झाला. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी तज्ज्ञ मार्गदर्शक, एनएमएमएस परीक्षा तज्ज्ञ मार्गदर्शक, एमटीएस, एनटीएस, गणित प्रज्ञाशोध, विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ मार्गदर्शक, सामान्यज्ञान परीक्षा मार्गदर्शक, इन्स्पायर अवॉर्ड-विज्ञान प्रदर्शनामध्ये सातत्याने तालुका व जिल्हास्तरावरील यश, विविध प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून यशस्वी सहभाग, विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन, कुप्पम राज्य आंध्रप्रदेश येथे आयोजित प्रशिक्षणात आठ दिवस सहभाग, गणित दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन अशा विविध उपक्रमामध्ये कृतीयुक्त सहभाग, उन्हाळी क्रिकेट शिबिरे व संस्कार शिबिरांचे आयोजन असे अनेक उपक्रम त्यांनी स्वजबाबदारीने यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. इस्त्रोभेट, विज्ञान प्रदर्शन विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धा, इंटरनॅशनल ओलंपियाड एक्झाम, इस्त्रो उत्तुंगतेज स्पर्धा परीक्षा, केंद्रशासन पुरस्कृत एनएमएमएस राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा, राज्यस्तरीय शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, विविध प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

सन 2007-2008 मध्ये सह्याद्री दूरचित्रवाहिनी व स्टार प्रवाह वाहिनीवरील' हा खेळ शब्दांचा' या कार्यक्रमांमध्ये यशस्वी सहभाग हे त्यांच्या शैक्षणिक कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य होय. इन्स्पायर अवॉर्ड- विज्ञान प्रदर्शन तज्ज्ञ परीक्षक, इयत्ता दहावी आयसीटी विषय जिल्हा समन्वयक व कलचाचणी जिल्हा समन्वयक म्हणूनही कार्य केले आहे. गणेशोत्सव कार्यक्रमांमध्ये सजीव व हलत्या देखाव्यांची निर्मिती, सण-समारंभ पर्यावरण पूरक साजरे करण्या बद्दल समाज प्रबोधन अशा सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शाळा सिद्धि उपक्रमामध्ये राज्य निर्धारक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा अशा सर्व निवडणुकीच्या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम मास्टर ट्रेनर, उत्कृष्ट फलकलेखक म्हणून त्यांनी यशस्वी भूमिका पार पाडलेली आहे. कोरोना सर्वेक्षण, कोविड योद्धा, पूरग्रस्तांना मदत, गरजू अनाथ व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, एड्सग्रस्त मदत, निवारा बालगृह मदतनिधीतही त्यांनी भरीव कार्य केले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील सहभाग उल्लेखनीय आहे.'लायन्स क्लब, इंटरनॅशनल' या जागतिक संस्थेचे ते सक्रिय सभासद आहेत. शासकीय ज्युदो क्रीडा प्रकारामध्ये राज्यस्तरीय खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राष्ट्रीय व उपक्रमशीलता या अष्टपैलू कार्याची नोंद घेऊन कै.माणिकराव पाटील एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूरच्या पदाधिकारी सुनीता पाटील, धनश्री पाटील, डॉ.राजेश सूर्यवंशी, तुषार पाटील व पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आजरा महाल शिक्षण मंडळ,आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, खजिनदार सुनील पाटील, सचिव अभिषेक शिंपी व सर्व संचालक मंडळाचे त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. मुख्याध्यापक आर.जी. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळाले.
======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...