Thursday, March 27, 2025

कॅन्सरमुक्ती लसीकरण मोहीम लोक चळवळ झाली : सुप्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डाॅ. राधिका जोशी यांचे प्रतिपादन; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून मुली व तरुणींना सुरक्षाकवच

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजेच सर्वाइकल कॅन्सर ही संपूर्ण देशभर फार मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मी अल्पशा प्रमाणात लसीकरण आणि जनजागृती करीत होते. परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहयोगाने ही मोफत लसीकरणाची मोहीम लोक चळवळ झाली, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डाॅ.  राधिका जोशी यांनी केले. मुलींनो आणि अविवाहित तरुणींनो, एचपीव्ही लसीकरण करून घ्या आणि कॅन्सरमुक्त जीवनाचा आनंद लुटा, असेही त्या म्हणाल्या. गडहिंग्लजमध्ये आयोजित कॅन्सरमुक्तीच्या मोफत लसीकरण मोहिमेच्या नियोजनाच्या बैठकीत डाॅ.  जोशी बोलत होत्या. गडहिंग्लज शहरासह कडगाव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघातील नऊ वर्षापासून २६ वर्षापर्यंतच्या मुली व अविवाहित महिलांना नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने मोफत लसीकरण केले जाणार आहे.
        
डॉ. राधिका जोशी पुढे म्हणाल्या, कोल्हापुरात डॉक्टरांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमांमध्ये मंत्री मुश्रीफ यांना मी या लसीचे महत्व सांगितले. त्यांनी तात्काळ अगदी आठवड्याभराच्या आतच संपूर्ण जिल्हाभर लसीकरण राबविण्याचे नियोजन केले. बाजारात महाग असणा-या या लसीचे त्यांनी चक्क मोफत लसीकरण आयोजित केली. त्यांच्या या वचनपूर्तीने मी भारावून गेले, असेही त्या म्हणाल्या. महिलांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरमुक्तीसाठी संशोधित झालेली ही लस जागतिक आरोग्य संघटनेने (W.H.O.) शिफारस केलेली आहे. तसेच; विविध भारतीय आरोग्य संघटनांनीही या लसीला मान्यता दिली आहे. ही लस  सर्वाधिक सुरक्षित आणि खात्रीशीर असून यापासून कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असेही डॉ. जोशी म्हणाल्या.
           
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, तीन आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनापासून कागल तालुक्यापासून या मोहिमेला सुरुवात केली आहे. मुली आणि अविवाहित महिलांकडून या लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. येणारी पिढी कॅन्सरमुक्त घडवण्याच्या दृष्टीने मंत्री हसन मुश्रीफ यांनी उचललेले हे पाऊल लौकिकास्पद आहे. यावेळी सीपीआरचे अधीक्षक डाॅ.  शिशिर मिरगुंडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, नगरपालिका मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, गडहिंग्लज तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. गीता कोरे, गटशिक्षणाधिकारी श्री. हलाबगोळ, हरून सय्यद, सिद्धार्थ बन्ने, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, अमर मांगले सौ. रेश्मा कांबळे, सौ. शर्मिली पोतदार, डॉ. बेनिता डायस आदी प्रमुख उपस्थित होते.
================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...